मुक्तपीठ टीम
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सल्लागाराने दावा केला आहे की, भाजप गुजरातमधील काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती काँग्रेस नेतृत्वालाही देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
सिरोही मतदारसंघाचे आमदार संयम लोढा यांनी ट्विट करत, काँग्रेसला सावध राहण्यास सांगितले. त्यांनी लिहिले होते की, ‘गुजरात विधानसभा निवडणूक २०२२, भाजपाच्या काँग्रेसच्या दहा आमदारांवर नजरा आहेत. निरोगी राहा, सतर्क रहा.’ त्यांनी या ट्विटमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वडरा यांनाही टॅग केले.
लोढा म्हणाले, ‘मी काँग्रेसला इशारा दिला आहे. मला याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे मी पक्षाला कळवले आहे. मी २० दिवसांपूर्वी रघू शर्मा यांना सांगितले. परंतु त्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मी पक्षाच्या हायकमांडला सावध करण्यासाठी टॅग केले. जर तुम्ही झोपत राहिलात तर हे होणारच. आम्ही भाजपाविरोधी आहोत आणि चिंता व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे.’
गुजरातमध्ये २०२० मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामा देऊन नंतर भाजपामध्ये प्रवेश केला होता. नुकतेच काँग्रेसचे ५ माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सध्या राज्यात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ६५ आहे.