मुक्तपीठ टीम
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले नाशिक शहर नंतर मनसेच्या इंजिनासोबत धावले, पुढे इंजिन थांबलं आणि गोदावरीत कमळं उमलली. त्यामुळे मनसे आणि भाजपा दोन्ही पक्षांसाठी नाशिक महत्वाचं आहे. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघांमध्ये उभ्या-उभ्या झालेली दहा मिनिटांची चर्चा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी, “राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही”, असं म्हटलं होतं. रविवारी दोघांमध्ये चर्चा झाली.
राज ठाकरेंशी चर्चेबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
- आम्ही काही फक्त हवा पाण्याची चर्चा केली नाही.
- राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे.
- राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल.
- मुंबईत गेल्यावर पुन्हा राज ठाकरे यांना भेटणार आहे.
- आमच्या दोघांची विद्यार्थी चळवळीपासूनची ३०-४० वर्षांची मैत्री आहे.
पाटील-ठाकरे उभ्या-उभ्या चर्चा
- राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या प्रवेशदारातच भेट झाली.
- राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्रामगृहाबाहेर जात होता.
- त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज ठाकरे यांना नमस्कार केला. राज ठाकरेही गाडीतून बाहेर आले.
- दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच उभ्या-उभ्याच चर्चा झाली.
- दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली.
- चर्चा सुरु असताना राज ठाकरे हाताची घडी घालून होते.
- चंद्रकांत पाटील त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते.
- राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते.
- राज ठाकरे त्यांच्या बोलण्यावर मानही डोलवताना दिसले.