मुक्तपीठ टीम
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले ७८ दिवस शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली, ६ फेब्रुवारीला चक्का जामा यानंतर आता १८ फेब्रुवारीला रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची झळ अधिक मोठ्या वर्गाला बसण्याची शक्यता आहे.
संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे. तर त्याआधी १२ फेब्रुवारीला राजस्थानमधील सर्व टोलनाके शेतकरी टोलमुक्त करणार आहेत.
तसेच १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा स्मृति दिनानिमित्त शहिद जवान आणि आंदोलनादरम्यान निधन पावलेल्या शेतकर्यांसाठी मेणबत्ती मार्चा, मशाल मोर्चा आणि अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर 16 फेब्रुवारीला शेतकरी नेते सर छोटूराम यांच्या जयंती दिनी देशभरातील शेतकरी एकजूट दाखवतील, अशी घोषणाही संयुक्त किसान मोर्चानं केली आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ६ फेब्रुवारीला केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा केली आहे.