मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी एका फ्रान्स वृत्त संस्थेने सादर केलेल्या एका बातमीमुळे राफेल करारातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणी नव्याने चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मनोहर लाल शर्मा या इसमाने दाखल केली असून यात त्यांनी कथित भारतीय मध्यस्थी सुशेन गुप्तावर खटला दाखल करुन न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रतिवादी केले आहे.
मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका ६ एप्रिल रोजी दाखल केली होती. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. शर्मा यांनी २०१५च्या राफेल करारातील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी याआधीही याचिका दाखल केली होती. ती याचिका २०१९मध्ये फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१९मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली. पण तीही फेटाळली गेली. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांनाही प्रतिवादी बनवत दाखल केलेल्या याचिकेचे काय होते, तेथे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा राफेल घोटाळा का चर्चेत?
- सुशेन गुप्ता या मध्यस्थाला डसॉल्ट आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी दिलेल्या रकमेची तपासणी भारतीय अंमलबजावणी संचालनालयाने केलीच नव्हती.
- गुप्ताने संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत केले होते.
- या कागदपत्रांच्या सहाय्याने भारताच्या गुप्त धोरणांची माहिती कंपनी पुढे उघड करण्यात आली.
- त्यामुळे कंपनीला भारताला राफेल विकण्यास मदत झाली.