मुक्तपीठ टीम
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील स्वातंत्र्यदिन अधिकच उत्साहात साजरा झाला. त्यासाठी आयोजित विविध उपक्रम आणि घरोघरी तिरंगा डौलानं फडकवण्यातही नागरिकांचा उत्साह दिसला. मात्र, त्यानंतर नेहमीप्रमाणेच घडले. उत्सव संपला आणि डौलानं मिरवलेले तिरंगे झेंडे अनेक ठिकाणी तसेच पडले. तिरंगा अभियानातून स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करत पुण्यातील कीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मने तिरंग्याचा अभिमान जपला. त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मतर्फे मंगळवारी (ता. १६) सकाळी कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता यासह शहराच्या विविध भागात हे ध्वज संकलन अभियान राबवले. ‘कीर्तने अँड पंडित’चे पार्टनर सीए मिलिंद लिमये यांच्या नेतृत्वात जवळपास १०० लोकानी यात सहभाग घेतला. यामध्ये सीए, आर्टिकलशिप करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, ‘विकासा’च्या चेअरमन मौसमी शहा, सीए शशांक पत्की, ‘कीर्तने अँड पंडित’चे पार्टनर श्रीपाद कुलकर्णी, प्रल्हाद मानधना, तन्मय बोधे व आनंद जोग आदी उपस्थित होते.
सीए मिलिंद लिमये म्हणाले, “प्रत्येक भारतीयांचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होऊ नये, त्याचा उचित सन्मान व्हावा, या हेतूने ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ हे विशेष ध्वज संकलन अभियान राबविले. ‘कीर्तने अँड पंडित’मधील माझ्या सहकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात फिरून ध्वज संकलित केले. हे सर्व ध्वज सन्मानपूर्वक भारत फ्लॅग फाउंडेशनकडे सुपूर्त केले जाणार आहेत. व्यावसायिकतेसह सामाजिक भान जपणारी आमची सीए फर्म आहे.”
पाहा: