मुक्तपीठ टीम
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित भिकाशेठ औटी यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जागतिक विद्यार्थी दिनी प्रा. डॉ. औटी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सोशल रिफॉर्म्स अँड रिसर्च, ग्रेटर नोएडा येथील आयआयएमटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि उत्तर प्रदेशातील इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरशाखीय संशोधनातील नवी क्षितिजे’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. अभिजित औटी गेल्या २२ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ट्रिनिटी कॉलेजसह सिम्बायोसिस विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व्हीआयटी, जेएसपीएम आदी शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. आजवर त्यांचे २५ हुन अधिक संशोधन प्रबंध प्रकाशित झाले असून, १७ पुस्तकेही प्रकाशित आहेत. आठ पेटंट प्रकाशित आहेत. पीएचडीचे मार्गदर्शक म्हणूनही ते सहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.