मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा हे १९७७ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकार होते. सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. या आधी त्यांना पंतप्रधान कार्यालयात काही काळ ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
पीके सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयाचे दुसरे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असलेले नृपेंद्र मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता. पीके सिन्हा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.
पीके सिन्हा यांना मे २०१५ मध्ये दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आले होते. पण नंतर त्यांचा कार्यकाळ तीन वेळा वाढविण्यात आला. त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार बनविण्यात आले.
सिन्हांचा कार्यकाळ
- पंतप्रधान मोदींचे मुख्य सल्लागार असलेले पीके सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.
- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयातही पदव्युत्तर पदवी संपादन केली.
- सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९७७ च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत.
- पी.के. सिन्हा यांनी केंद्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे विभागही सांभाळले आहेत.
- पीके सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले.
- पीके सिन्हा यांनी विद्युत आणि नौकानयन मंत्रालयात सचिव काम केले
- पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात विशेष सचिव म्हणूनही काम केले आहे.
- त्यांनी चार वर्षे कॅबिनेट सचिव म्हणूनही काम केले आहे.
- सिन्हा यांनी ऊर्जा मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.