मुक्तपीठ टीम
“नोकरी तुमची गरज पूर्ण करते, तर उद्योग तुमची स्वप्न पूर्ण करतात. त्यामुळे उद्योग-व्यवसाय करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. उद्योगात भांडवल यापेक्षाही मानसिकता महत्वाची आहे. आपल्या मनातील आग, जिद्द, आत्मविश्वास, त्याला मिळालेली कठोर परिश्रम आणि बाजारपेठेची जाण यामुळे यशस्वी उद्योजक होता येते,” असा कानमंत्र ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत आपटे वसतिगृहात आयोजित उद्योजकता विकास मार्गदर्शन सत्रात पवार बोलत होते. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, ज्योती गोगटे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी सुरेश उमाप आदी उपस्थित होते. प्रसंगी समितीतील विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.
प्रतापराव पवार म्हणाले, “आजवर मोठे होऊन चांगली नोकरी करावी, अशीच शिकवण दिली जाते. मात्र, हे बदलून लहापणापासूनच उद्योगाचा संस्कार दिला पाहिजे. त्यातून येणारी पिढी उद्योगाची कास धरेल. आपल्या व्यवसायाची सखोल माहिती व लोकांची गरज याची सांगड घालता आली पाहिजे. आज अनेक पर्याय, तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून आपण उद्योग सुरु करावेत. अपयशातून शिकत जावे. जिद्द सोडू नये. उद्योजकासह चांगला व्यक्ती बनण्यावर लक्ष द्या. “
यावेळी पवार यांनी अनेक यशस्वी उद्योजकांची यशोगाथा सांगितली. महाराष्ट्रात लाखो उद्योग आहेत; परंतु उद्योगात मराठी माणूस नाही, हे खेदजनक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी उद्योजकता विकास केंद्र सुरु करीत आहोत. यातून मुलामुलींची नोकरीची मानसिकता बदलेल, असे सुरेश उमाप यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजकता आणि सरकारी योजना याविषयी माहिती दिली.