मुक्तपीठ टीम
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता नवं वळण आले आहे. एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने हिरेन यांची हत्या करण्यासाठी शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचा दावा एनआयएने केला आहे. प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी असल्याने ते त्याच्याविरुद्धचे पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकतात.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी उभी केल्यानंतर काही दिवसांतच गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता. एनआयएने जून २०२१ मध्ये या प्रकरणी प्रदीप शर्माला अटक केली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. यावर्षी मार्चमध्ये एनआयए न्यायालयीने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनू मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला न्यायमूर्ती एएस चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या खंडपीठासमोर विरोध करत प्रदीप शर्मा निर्दोष नसल्याचे सांगितले.
मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीतच हा कट रचण्यात आला होता…
- मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत प्रदीप शर्माने हत्येचा कट रचल्याचे एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
- प्रतिज्ञापत्रानुसार, मनसुख हिरेन यांनी स्वतः स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाजवळ पार्क करण्यास नकार दिला होता.
- मात्र या संपूर्ण कटाची त्याला कल्पना आली होती.
- त्यामुळे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.
- या कामासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिले.
- एनआयएने या प्रकरणात प्रदीप शर्मा आणि इतर सहआरोपींना यूएपीए (बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) अंतर्गत अटक केली आहे.
- एनआयएने हिरेनची हत्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे म्हटले आहे.