मुक्तपीठ टीम
अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी एखाद्या गोष्टीवरील वादग्रस्त विधान तर कधी ट्विटर वरील हल्लाबोल. पण कंगणाचे नाव नेहमीच चर्चेत असते. आपल्या अतिस्पष्टवक्तेपणा साठी ती ओळखली जातेच. बॉलीवूडमधील घराणेशाहीपासून कोणत्याही वर्तमान घडामोडींवर बेधडक भाष्य करण्यासाठी ती ओळखली जाते. काही दिवसांपुर्वी कंगनाने अंदमानचा दौरा केला. त्या दरम्यान सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षेदरम्यान ठेवलेल्या कोठडीस देखील भेट दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा कंगणा राजकीय भूमिकेचा विचार करत आहे का, अशी चर्चा रंगत आहे. पण ती चित्रपटातून असेल की थेट राजकारणातील यावर अद्याप स्पष्टता नाही.
कंगनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलेल्या कोठडीचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत कंगनाने तुरुंगाच्या परिसराचाही फोटो शेअर केला आहे. सावरकरांना ठेवण्यात आले होते त्या कोठडीच्या बाहेर एक फलक आहे. त्यावर विनायक दामोदर सावरकर १९११ ते १९२१ या काळात या कोठडीत राहत होते असे लिहिले आहे.
कंगनाने मांडल्या स्वत:च्या भावना
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंसोबत कंगनाने लिहिले- “आज अंदमान बेटाच्या पोर्ट ब्लेअर येथील काळे पाणी सेल्युलर जेलमधील वीर सावरकर सेलला भेट दिली. जेव्हा अमानुषता शिगेला पोहोचली होती, तेव्हा सावरकरांच्या रूपातील माणुसकी सर्वोच्च स्थानावर होती आणि त्यांनी प्रत्येक क्रूरतेचा डोळ्यात डोळे घालुन निर्धाराने सामना केला. त्या दिवसांत ते किती घाबरले असतील कारण त्यांना फक्त काळ्या पाण्यातच ठेवले नव्हते, तर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. या छोट्याशा कोठडीतून सुटणे अशक्य होते, तरीही तुरुंगाच्या जाड भिंतींमध्ये त्यांना साखळदंडाने बांधलेले होते. कदाचित महासागराच्या मध्यभागी कोठेतरी असीम हवेत अदृश्य होण्याची भीती वाटत असावी, किती भित्रे होते ते लोक? आपल्याला पुस्तकांमध्ये शिकवले जाते ते नाही, ही कोठडी स्वातंत्र्याचे सत्य आहे, मी कोठडीत ध्यान केले आणि वीर सावरकरजींबद्दल कृतज्ञता आणि मनापासून आदर व्यक्त केला. स्वातंत्र्यलढ्याच्या या खऱ्या वीराला माझा सलाम. जय हिंद.”
काही दिवसांपूर्वीच कंगना भाजपात प्रवेश घेणार असल्याची चर्चा सुरू होती आणि आता कंगणाच्या अंदमान दौऱ्याला राजकीय वळण देण्यात येत आहे. कंगणा लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीच्यावेळीही तिचे नाव चर्चेत होते. आता पुन्हा एकदा तिच्या राजकारण प्रवेशाची चर्चा रंगली आहे.