मुक्तपीठ टीम
त्रिपुरामधील कथित न घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रत्यक्षात हिंसाचार झाला. भाजपाने आज अमरावती बंदची हाक दिली होती. त्या बंदलाही जमावाच्या तोडफोडीने हिंसक वळण लागलं आहे. स्वाभाविकच आता या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजाकारणही तापू लागलं आहे. आघाडीचे नेते भाजपावर तर भाजपा नेते आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
त्रिपुरात न घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रात हिंसाचार! – फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावर घटनेवर भाष्य करत म्हणाले की, त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. दुकानांची तोडफोड केली जात आहे. त्यात हिंदूंची घरे जाळली जात आहेत. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे धोकादायक आहे. थांबायला हवे, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
- त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले.
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.
- हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- न घडलेल्या घटनेवरून होणारे आंदोलन हा गंभीर प्रकार आहे तो सरकारने लक्षात घ्यावा.
- अमरावतीमध्ये मोर्चे निघतच आहेत. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे.
- आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील पडसादामागे भाजपा – राऊत
त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल संजय राऊत यांनी केला. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथपर्यंत पोहोचलेलं आहे. असेही ते म्हणाले.
शांती भंग करण्याचे अनेकांचे कारस्थान – मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं की, आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अमरावती, नांदेड मालेगाव या ठिकाणी लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. नागरिकांनीही हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस कायदा सुव्यवस्था राखतील. शांतता ठेवावी. माथी भडकविणाऱ्यांचं ऐकू नका. राज्यात शांती भंग करण्यासाठी अनेक लोक कारस्थान करत आहेत. त्याला बळी न पडता शांतता राखा, असं आवाहन त्यांनी केले आहे.
दंगलीची हिंमत आताच का झाली?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, तुम्हाला झोपताना, उठताना भाजपा दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला. आरोग्य पेपर आम्हीच फोडला. शेतकरी पैसे आम्ही थांबवले. अरे काय चेष्टा चाललीय. सगळीकडे भाजपचा हात मग तुम्ही तीन पक्ष समर्थ आहात ना? भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. म्हणजेच तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत. सरकारने हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पद जातील. गृहमंत्री तुरुंगात आहेत. काही सुपात आहेत, तर काही जात्यात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केली.
त्रिपुरात कथित अनुचित प्रकार घडला. मात्र, दंगल मालेगाव आणि अमरावतीमध्ये झाली. इतकी वर्ष हिंमत झाली नाही. इतकी हिंमत होते, कारण पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील. अमरावतीत खुले आम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.