पोलिसांविषयीची एक बातमी वर्दीतील अनलिमिटेड माणुसकीचं दर्शन घडवणारी आहे. नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीमुळे एका गरोदर महिलेची सुखरुप प्रसुती शक्य झाली आहे.
नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीतीन पवार, हवालदार उगले, कॅान्स्टेबल गिरीश महाले आणि राहुल सोलसे हे मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर हद्दीत दुचाकीवर पेट्रोलिंग करत होते. त्यांना अचानक पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगापूर गावातील रस्त्यावर चार लोक दिसले. त्यांची चौकशी केली तर भारती जाधव या महिलेला प्रसूती वेदना होत होत्या आणि ती मदतीसाठी विनवणी करत होती. तिचे वृद्ध सासू-सासरे मदतीसाठी याचना करत होते.
गंगापूर पोलीस ठाण्याचे एपीआय नितीन पवार यांनी सांगितले की, भारती जाधव या महिलेला पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी प्रसूती वेदना होऊ लागल्या, त्यांच्या घरापासून त्या सासू-सासऱ्यांसह जवळजवळ एक किलोमीटर चालत गेल्या होत्या. त्यावेळेस वाहन मिळण्याची शक्यता कमी होती. परंतु, गर्भवती महिलेची चालण्याची स्थिती नव्हती. त्यावेळेस तिचे पतीही शहराबाहेर होते.
त्यानंतर पवार यांनी तातडीने पोलिसांची गस्तीची गाडी मागविली. भारतीची गिरनारे ग्रामीण रुग्णालयात नोंद झाली असल्याने पोलीस गाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाहेर काढावी लागली, म्हणूनच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांना पवार यांनी फोन करून परिस्थितीची माहिती दिली. आंचल मुदगल यांनी गस्त घालणाऱ्या पथकाला तातडीने त्या महिलेस ९ किलोमीटर लांब असलेल्या गिरनारे ग्रामीण रुग्णालयात नेण्याची सूचना केली.
भारती यांना पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पोलीस आयुक्त दीपक पांडे, डीसीपी अमोल तांबे, एसीपी दीपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याचे पवार म्हणाले. भारती यांना रुग्णालयात तातडीने वेळेवर घेऊन जाताना, कॅान्स्टेबल गिरीश महाले आणि राहुल सोलसे यांनी धीर देऊन महत्त्वाची भूमिका बजावली.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: