मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आंध्रप्रदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाण मार्गाजवळ काळे फुगे दिसले. काँग्रेसकडून निषेध म्हणून हे काळे फुगे उडवण्यात आल्याचे समजले जात आहे. यावेळी पोलिसांनी चार काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र या घटनेमुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
नेमकं काय घडलं?
- स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान आंध्र प्रदेशात आले होते.
- यावेळी आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पंतप्रधानांच्या राज्याच्या भेटीदरम्यान आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यासह अनेक आश्वासन न पाळल्याचा निषेधासाठी आंदोलन केले.
- दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर सुमारे ८०० पोलीस तैनात करण्यात आले होते.
- गन्नावरम विमानतळावरून पंतप्रधानांच्या दोन हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
- यावेळी विमानतळाजवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावरून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काळे फुगे सोडून पंतप्रधानांचा निषेध करण्यात आला.
- या घटनेचा एका व्हिडिओ आता समोर येत आहे.
Excellent protest by @INC_Andhra by showing black balloons to PM @narendramodi ji…#ByeByeModi pic.twitter.com/RUef3gFqGb
— INC Andhra Pradesh (@INC_Andhra) July 4, 2022
एसपीजीने आंध्र प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागवले!
- एसपीजीने काळे फुगे सोडणे अत्यंत गांभीर्याने घेतले असून या प्रकरणी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
- फुग्यांसोबत ड्रोन असते तर काय झाले असते, असा सवाल एसपीजीने राज्य पोलिसांना विचारला आहे.
- कृष्णा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी जोशुआ यांनी सांगितले की, विमानतळावर सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती.
- विमानतळापासून साडेचार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरमपल्ली गावात एका बांधकामाधीन इमारतीतून काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी फुगे सोडले.
- त्यांनी फुगे सोडले तोपर्यंत पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर विमानतळावरून निघाले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई!
- याप्रकरणी तीन काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
- भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.