मुक्तपीठ टीम
राजस्थानच्या जयपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची तीन दिवसीय बैठक सुरू आहे. शुक्रवारी, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले, “आज जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतातील जनतेचा विश्वास भाजपावर आहे. भाजपाने आता पुढील २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित ठरवलं पाहिजे!”
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पक्षाकडे आशेने आणि विश्वासाने पाहणाऱ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करण्यावर भर देण्यास सांगितलं. या बैठकीत गुजरात आणि हिमाचलच्या या वर्षी होणाऱ्या निवडणुका, पुढील वर्षी होणाऱ्या अनेक राज्यांच्या निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.
मोदी पुढे म्हणाले, “जनसंघापासून सुरू झालेला आमचा प्रवास भाजपा म्हणून भरभराटीला आला, पक्षाचे हे रूप, त्याचा विस्तार पाहिला तर अभिमान वाटतो, पक्षाच्या प्रगतीसाठी झटलेल्या प्रत्येक नेत्याला मी वंदन करतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले. . आज हे वर्ष आदरणीय सुंदर सिंह भंडारी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. अशा प्रेरणादायी माणसाला आपण सर्वजण मनापासून नमन करूया.”
पंतप्रधान मोंदी भाजपाच्या कार्यकर्त्यांना २५ वर्षांचा कानमंत्र!!
- पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील लोकांची आशा आणि आकांक्षा आपली जबाबदारी खूप वाढवते.
- स्वातंत्र्याच्या या अमृत काळात देश पुढील २५ वर्षांसाठी आपले लक्ष्य निश्चित करत आहे.
- पुढील २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी भाजपाकडेही वेळ आहे.
- देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.
- देशासमोरील आव्हानांना देशातील जनतेला सोबत घेऊनच पराभूत करावे लागेल.
- ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’ हा आपला मंत्र आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासूनच्या काळाला गवसणी घातली, “मित्रांनो, देशातील जनतेने २०१४ मध्ये नवा इतिहास लिहिण्याचा निर्णय घेतला. या विचारसरणीतून भाजपाने देशाला बाहेर काढले आहे. आशेचे युग, निराशेचे नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाला निकाल हवा आहे. सरकारला काम करताना पाहायचे आहे. त्याचा निकाल डोळ्यासमोर पहायचा आहे. राजकीय फायदा आणि तोटा बाजूला ठेवून हा एक मोठा सकारात्मक बदल आहे असे मी मानतो. १३० कोटी लोकांच्या आकांक्षा अशाच वाढल्या तर सरकारांची जबाबदारीही वाढते.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या महिन्यात केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ८ वर्षे पूर्ण होत आहेत. ही ८ वर्षे देशातील लहान शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत. देशाचा समतोल विकास, सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा. ही ८ वर्षे देशाच्या माता-भगिनी-मुलींचा मान-सन्मान वाढवण्याचवर काम करतेय. ही आठ वर्षे संकल्पांची आणि कर्तृत्वाची आहेत. ही ८ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित आहेत. आम्हाला आराम करण्याची गरज नाही. आजही आपण अधीर, अस्वस्थ, आतुर आहोत कारण आपले मूळ ध्येय भारताला त्या उंचीवर नेणे हे आहे ज्याचे स्वप्न देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांनी पाहिले होते.”
पक्षाच्या सरचिटणीसांनी पहिल्या दिवशी अहवाल सादर केला…
- भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राष्ट्रीय सरचिटणीसांच्या बैठकीपासून पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली.
- बैठकीपूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचे दिग्गज नेते कुशाभाऊ ठाकरे आणि सुंदरसिंग भंडारी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेट दिली.
- पहिल्या दिवशीच्या बैठकीत भाजपाच्या सरचिटणीसांनी त्यांच्या प्रभाराखालील राज्यांचा सविस्तर अहवाल सादर केला.
- त्यावर नड्डा यांनी पक्षाचे कार्यक्रम जलद पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
- या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पक्षप्रमुख आणि संघटनात्मक सचिवांसह वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
- तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच या वर्षी आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा होणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.