मुक्तपीठ टीम
मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचं पुढे भवितव्य फार नसतं असं सहजच बोललं जातं, आता मात्र अशांसाठी आशेचा किरण आहे. मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना दोन वेतन वाढ मिळणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय मराठी भाषिकांना सुखावणारा आहे. याचे श्रेय शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघातील आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला जाते.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १००% वापर व्हावा त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने परिपत्रक काढण्यात आले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मराठी प्रोत्साहनाच्या निर्णयाचे फायदे
- मनपाच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १००% वापर होणे आवश्यक आहे.
- मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
- वरील उद्देशांमुळे मराठी भाषा विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता.
- मात्र या निर्णयाची अंमलबजावणी २०१५ पासून पुढे बंद होती.
- त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते.
- त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी २०१६ ते २०१८ पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.
मुंबई मनपातील १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार फायदा
- त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन तातडीने बैठक बोलावली.
- त्यानंतर या प्रश्नचा आढावा घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.
- त्याचा फायदा मुंबई मनपातील जवळपास १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार आहे.
- या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर ५२ लाख ६३ हजार रुपयांचा भार पडणार आहे.
पदव्युत्तर पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ
- या निर्णयामुळे मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहे.
- या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता कर्मचाऱ्यांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे माय मराठीसाठी मनपाचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
- या विषयावर गेल्या आठवड्यांत झालेल्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्यानंतर या विषयाची तपासणी करून आठ दिवसांत मनपा आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.
- पुढील तीन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी आमदार प्रभू यांना आश्वस्त केले होते.