मुक्तपीठ टीम
न्यायालय म्हटलं की प्रत्येकाला एक भीती वाटतेच वाटते. त्याचं कारण न्यायालयात पाळले जाणारे नियम फारच वेगळे असतात. त्याची माहिती नसेल तर खडसावलंही जातं. तेही चारचौघात. बहुधा त्यामुळेच शहाण्यानं न्यायालयाची पायरी चढू नये, असं म्हणतात. आता ताजं उदाहरण एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचं आहे. ते शर्ट-ट्राऊझरमध्ये पाटणा उच्च न्यायालयात गेले. तेथे ते बोलण्यापूर्वीच न्यायाधीशांनी त्यांना ड्रेस कोडवरून खडसावलं.
सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ड्रेस कोडसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाटणा उच्च न्यायालयाचा असल्याचं कळतं.
राष्ट्रीय माध्यमांमधील बातम्यांनुसार, ही घटना न्यायाधीश पीबी बजंथारी यांच्या न्यायालयातील आहे. हा सर्व प्रकार न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच घडला. आयएएस अधिकारी बोलायला उभे राहिले. ते बोलत असताना, न्यायाधीश पीबी बजंथरी यांनी त्यांना थांबवले आणि त्याच्या ड्रेस कोडवर प्रश्न उपस्थित केला.
न्यायाधीशांनी आयएएस अधिकाऱ्याला काय खडसावलं?
- न्यायमूर्ती म्हणाले की कोणत्या ड्रेसमध्ये कोर्टात हजर राहायचे हे माहित नाही का?
- किमान कोट आणि कॉलर तरी उघडी नसावी.
- न्यायाधीश एवढेच बोलून थांबले नाही तर त्यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला जाब विचारत खडसावले की, तुम्ही मसुरी येथील सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये भाग घेतला नाही का?
- तुम्हाला कोर्ट म्हणजे काय सिनेमा हॉल वाटतो का?
न्यायमूर्ती इतकं बोलताच न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीशांच्या प्रश्नावर आयएएस अधिकारी आनंद किशोर स्पष्टीकरण देत होते, परंतु न्यायाधीशांनी त्यांचे ऐकून घेतलं नाही. ते फक्त सुनावत होते.