मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या डाळींच्या साठवणुकीवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या साठी प्रयत्न करा अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी डाळीच्या साठवणुकीवर बंदी घातली. त्यानंतर देशभरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांना परिस्थितीची माहिती देण्यासंदर्भात सुचवले होते. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेतली.
या बैठकीस व्यापारी प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. साठवणुकीच्या मर्यादा आल्याने डाळींच्या दरामध्ये ५०० ते १ हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये डाळी विकाव्या लागत आहेत. या विषयात वाणिज्य मंत्र्यांनी लक्ष घालावे.शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे. डाळींचा हंगाम संपलेला असून सरकारने हमीभावाची खरेदी केंद्र बंद केली आहेत. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता तेजी-मंदीचा फायदा घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल घरात ठेवलेला आहे. त्यांना आता कमी दरात विक्री करावी लागत आहे, अशी माहिती पाशा पटेल यांनी या बैठकीत गोयल यांना दिली. शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन गोयल यांनी दिल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.