परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील कुकुट पालन करणार्या शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून मुरुंबा शिवारातील कुकूटपालन करणाऱ्या, शेतकऱ्यांनी पाळलेल्या कोंबड्या मरून पडत आहेत. तेथील विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहात ७ जानेवारी रोजी ३३६, तर ८ जानेवारी रोजी ४६४ कोंबड्या अचानक मरण पावल्या. परंतु या घडलेल्या घटनेमुळे, गाव आणि परिसरामध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, परंतु अहवाल आल्याशिवाय बर्ड फ्लू समजू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी २४ ऑक्टोबरला विजयकुमार सखाराम झाडे यांनी ८०० कोंबड्या हिंगोली जिल्ह्यातून खरेदी केले होते. या पक्ष्यांना लासोटा, मानमोडी, आयबीडी, मरेक्स या रोगाची लस देण्यात आली होती. कावेरी या जातीच्या असलेल्या कोंबड्या अंदाजे दिड ते दोन किलो ग्रॉम वजनाच्या असून त्यांचे वय साडे तीन महिने होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या अनुषंगाने शुक्रवारी एक आदेश काढला आहे. त्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मुरुंबा येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा प्रदर्शन अवागमनास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुरुंबा गाव शिवारातील ५ किमी परिसरात हा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच मुंरुबा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु या घडलेल्या घटनेमुळे गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, परंतु अहवाल आल्याशिवाय बर्ड फ्लू समजू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.