मुक्तपीठ टीम
पाकिस्तानने आपल्याच इंटेलिजन्स एजन्सी इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) चे प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल असद दुर्रानी यांना भारताचा गुप्तहेर म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने लेखी उत्तरात दुर्रानी यांचे नाव एक्झीट कंट्रोल लिस्ट (ईसीएल) मधून काढून टाकू नये अशी विनंती इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली आहे. संरक्षण मंत्रालयाने कोर्टाला सांगितले की, “दुर्रानी हे भारतीय गुप्तचर यंत्रणा संशोधन व विश्लेषण शाखेच्या (रॉ) संपर्कात होते. तसेच यासंबंधित पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.”
असद दुर्रानी यांचे नाव अनेकदा भारतीय गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुल्लत यांच्याशी जोडले जाते. या दोन्ही माजी प्रमुखांनी मिळून ‘द स्पाय क्रॉनिकल्सः रॉ, आयएसआय अँड इल्यूजन ऑफ पीस’ या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. या कारणास्तव २०१८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने दुर्रानी यांच्यावर लष्करी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
सदर प्रकरणी असद दुर्रानी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते की सरकारने चुकीच्या पद्धतीने त्यांचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. तसेच परदेशात जायचे आहे, त्यामुळे सरकारने त्यांच्यावरील बंदी उठवावी, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. २०१९ मध्ये पाकिस्तानने दुर्रानीचा ईसीएलमध्ये समावेश केला होता.
आयएसआयचे माजी प्रमुख दुर्रानी यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तोडगा निघाला पाहिजे”. तसेच या खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
पुस्तकात काय?
दोन्ही माजी प्रमुखांनी लिहिलेल्या ‘द स्पाय क्रॉनिकल्सः रॉ, आयएसआय अँड इल्यूजन ऑफ पीस’ या पुस्तकामुळे पाकिस्तानी सैन्याचा खूप अपमान झाला होता. हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात काश्मीर, बुरहान वानी, हाफिज सईद, कारगिल युद्ध, कुलभूषण जाधव, बलुचिस्तान, सर्जिकल स्ट्राइक, ओसामा बिन लादेन यांच्यासह अनेक ज्वलंत मुद्द्यांचा उल्लेख आहे. तसेच कुलभूषण जाधव यांचे प्रकरण पाकिस्तानने योग्य प्रकारे हाताळले नाही असा आरोप त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. एवढेच नाही तर ओसामाच्या नेव्ही सील ऑपरेशनबद्दल ते म्हणाले होते की, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात याबद्दल एक गुप्त करार होता.