विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील शाळांना पुन्हा वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर शिक्षक आणि इतर कर्मचार्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असलेल्यांना कार्यरत होण्याची परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता नववी ते बारावीसाठी शाळा सध्या सुरु आहेत. ८८% पेक्षा जास्त शाळा सुरु झाल्या आहेत. दररोज १५ लाख ७० हजार विद्यार्थी उपस्थिती लावत आहेत.
पहिल्या आठवड्यात २२ हजार २०४ पैकी ९ हजार १२७ शाळा पुन्हा उघडल्या आणि २ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची हजेरी लागली होती. ४ जानेवारीपर्यंत १९ हजार ५२४ शाळांनी पुन्हा कामकाज सुरू केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उप-संचालक विकास गरड यांनी सांगितले की, शाळांमध्ये कोरोना संसर्गाचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. यामुसाठी शाळा पुन्हा उघडण्यास प्रोत्साहित केले गेले आहे. काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. पण आता प्रत्येक आठवड्यात मुलांची संख्या वाढत आहे.
जळगाव जिल्ह्यातील १००% शाळा पुन्हा उघडल्या आहेत. वर्गात ५३.२% विद्यार्थी उपस्थित आहेत, असे १६ जिल्हे आहेत ज्यात ९०% पेक्षा जास्त शाळांनी पुन्हा प्रत्यक्ष वर्ग सुरु केले आहेत. शिक्षण अधिकारी, स्थानिक प्रशासन, विद्यार्थी तसेच पालक यांचे प्रयत्न आणि सहकार्य यामुळेच उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा अजून सुरू करण्यात आल्या नाहीत. १५ जानेवारीपर्यंत शाळा उघडण्यात येणार नाही, असे बृहन्मुंबई महानगर पालिकेने नुकतेच जाहीर केले.