मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. या चिपी विमानतळचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. वर्षानुवर्षे वाट पाहावी लागल्यानं नवसाच्या मुलासारखा लाडका ठरलेल्या या विमानतळाचा शुभारंभ गाजला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या टोलेबाजीमुळेच जास्त!
चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमानिमित्त जवळजवळ १६ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वांसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरून लक्ष्य केले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत केली. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मागे हटले नाही. भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास त्यांनी सुरूवात केली.
राणेंच्या भाषणात शिवसेनेला टोमणे
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्यावेळीच बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या निमित्ताने चिमटे काढले. ते म्हणाले, उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल. राणे तेवढ्यावरच थांबले नाहीत. ते उद्धव टाकरेंना म्हणाले की, बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.
आज कोकण प्रदेश आणि माझ्या कोकणी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे! पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नैतृत्वाखाली आणि आमच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी व पाठपुराव्यामुळे आज महाराष्ट्रातील बहूप्रतिक्षीत चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळ… pic.twitter.com/UDatWTpyLb
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 9, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणात राणेंना दिले प्रत्युत्तर
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे.
- कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडे उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
- नारायण राणेंच्या प्रत्येक टोमण्याला उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आणि उत्तर दिले.
- काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणे वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळे असते.
- आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तसेच काही लोक आज याठिकाणी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Sindhudurg Greenfield Airport Inauguration-LIVE #ChipiAirport https://t.co/fixR5bssZq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 9, 2021
राणेंनी ऐकवली साहेबांची प्रेरणा, तर ठाकरेंनी ऐकवली साहेबांनी केलेली हकालपट्टी!
“सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. त्यावेळी विमानतळ उभारण्याचा मुद्दा माझ्यासमोर आला. उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केले आहे.” असे ही नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर उध्दव ठाकरेंनी या जाब घेत म्हटलं की, “नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे.”