मुक्तपीठ टीम
ओडिशा सरकारच्या दक्षता पथकाने शनिवारी संध्याकाळी बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भुवनेश्वर ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंडळाचे अतिरिक्त मुख्य अभियंता निहार रंजन दास यांना अटक केली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झाडा-झडती आणि तपासानंतर अतिरिक्त मुख्य अभियंता निहार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कोट्यवधींची जंगम मालमत्ता असल्याचे उघडकीस आले. या मालमत्तांमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये १ कोटी ७५ लाखांची गुंतवणूक आणि संबलपूर शहरातील १ कोटी २७ लाख किमतीचे आठ भूखंडाचा समावेश आहे.
एका भ्रष्टाचार प्रकरणात दक्षता विभागाने अतिरिक्त मुख्य अभियंता यांच्या जागेवर टाकलेल्या छाप्यात क्रिप्टोकरन्सी सापडली. त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. दक्षता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांनी तपासकर्त्यांना दारात उभे असलेले पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले क्रिप्टोग्राफिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तपासात काय सापडले?
- अतिरिक्त मुख्य अभियंता निहार हे ३१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार होते, पण २८ ऑक्टोबरला ते दक्षताच्या जाळ्यात अडकले, असे सांगण्यात आले.
- या अधिकाऱ्याकडे संबळपूरमध्ये १ कोटी २७ लाखाचे आठ प्लॉट, ६४.४२ लाख रुपयांचा विमा, ३९ लाख रुपयांच्या दोन चारचाकी, ३ लाख रुपयांच्या दोन दुचाकी, १० लाख रुपयांहून अधिक किमतीचे ३३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. १५.५५ लाख रुपयांचे घरगुती साहित्य आणि १.७ लाख रुपयांची रोकड सापडली आहे.