मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सची एजीएम म्हणजेच अॅन्युअल जनरल मिटींग नुकतीच झाली. यादरम्यान सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील शापूरजी पालोनजी ग्रुप म्हणजेच एसपी ग्रुप आणि टाटा ग्रुप यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष झाला. या बैठकीत टाटा सन्सने चेअरमनच्या नियुक्तीशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली, परंतु एसपी ग्रुपने मतदानात भाग घेतला नाही. सायरस मेस्त्री यांना आपलं वारसदार बनवल्यानंतर आलेल्या अनुभवांमधून धडा घेत टाटांनी सन्स आणि ग्रुप यांचा नेतृत्व पदं दोन वेगळी पदे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या चेअरमनची पदे वेगळी!
- मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने आगामी काळात सायरस मिस्त्री यांच्यासारख्या वादाची परिस्थिती दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
- या संदर्भात टाटा सन्सच्या भागधारकांच्या एजीएममध्ये आर्टिकल ऑफ असोसिएशनसह काही सुधारणांना मान्यता देण्यात आली.
- यानंतर आता टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या चेअरमनची पदे वेगळी करण्यात आली आहेत. आता या दोन पदांवर एकाही व्यक्तीची नियुक्ती करता येणार नाही.
- रतन टाटा २०१२पर्यंत टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते.
- यानंतर टाटा सन्सचे चेअरमन सायरस मिस्त्री आणि नंतर एन चंद्रशेखरन यांनी काम केले.
- हे दोघेही टाटा सन्सचे चेअरमन झाल्यावर त्यांना एकाच वेळी टाटा ट्रस्टचे चेअरमन करण्यात आले नाही. मात्र, तेव्हा तशी कायदेशीर तरतूद नव्हती. पण, आता या दुरुस्तीनंतर टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन कायदेशीरदृष्ट्या वेगळे असतील.
मिस्त्री वादात टाटा समूहाची विश्वासार्हता संपुष्टात आली
मिस्त्री वादामुळे टाटा समूहाची विश्वासार्हता संपुष्टात झाली होती. यामुळेच टाटा समूहाने भविष्यात असे वाद होऊ नयेत यासाठी खात्रीपूर्वक व्यवस्था केली आहे. नुकत्याच झालेल्या एजीएममध्ये कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या कलम ११८ मध्ये बदलांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता एखादी व्यक्ती टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचा एकाच वेळी अध्यक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात मिस्त्रीसारखे वाद टाळण्यास मदत होईल.
चेअरमन नियुक्ती किंवा काढून टाकण्यासाठी समिती स्थापन केली जाणार
- टाटा सन्सच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील कोणत्याही बदलासाठी मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या ७५ टक्के भागधारकांची मंजुरी आणि विशेष ठराव पास करणे आवश्यक आहे.
- टाटा सन्समध्ये अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल.
- अध्यक्ष कोण होणार हे ही समिती ठरवेल. अध्यक्षांना हटवायचे असले तरी तीच समिती निर्णय घेईल.