मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहेत. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमृता फडणवीसांनी केलेली प्रशंसा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणे मारत दोघांनी केलेलं कौतुक योगींना चर्चेत आणणारं ठरलं आहे. योगींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यांचे सरकार सर्व धर्मांना समान आदर देते, परंतु जर लोकांनी इतरांना त्रास देण्यासाठी त्यांच्या धर्माचे जाहीर प्रदर्शन केले तर ते खपवून घेतले जाणार नाही. योगींच्या भूमिकेला आता मुस्लिम धर्मगुरूंकडूनही पाठिंबा मिळत आहे, हे विशेष. काही धर्मगुरुंनी मुस्लिमांनी रस्त्यावर नमाज अदा करू नये, असं आवाहन केले आहे.
मुस्लिम धर्मगुरुंच्या नमाजासाठी मार्गदर्शक सूचना
- ईदपूर्वी आजच्या शुक्रवारी अलविदा जुम्मा नमाज पठण होणार आहे.
- मुस्लिम धर्मगुरूंनी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार अलविदा जुम्माची नमाज रस्त्यावर कुठेही अदा केली जाणार नाही.
- लोकांना त्यांच्या घरात किंवा मशिदीतच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- याशिवाय मशिदींमध्ये लाऊडस्पीकरचा आवाज कायद्यानुसार ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
- नमाजामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगींची कठोर भूमिका
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की त्यांचे सरकार सर्व धर्मांना समान आदर देते, परंतु जर लोकांनी इतरांना त्रास देण्यासाठी त्यांच्या धर्माचे जाहीर प्रदर्शन केले तर ते खपवून घेतले जाणार नाही.
- हनुमान जयंतीनिमित्त काही लोकांनी राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता.
- त्यामुळे अधिकाऱ्यांनी ३ मे रोजी ईद आणि अक्षय्य तृतिया एकत्र असल्याने कमालीची सतर्कता बाळगावी.
मुस्लिम धर्मगुरुंशी सरकारी अधिकाऱ्यांचा समन्वय
- उत्तरप्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मगुरू आणि पोलिस अधिकारी यांच्यात बैठका झाल्या आहेत.
- सरकारने पोलिसांना स्थानिक धर्मगुरूंच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना धर्मगुरुंशी समन्वयावर खास लक्ष देण्यास सांगितले आहे.
- धार्मिक नेते आणि मशिदी आणि मंदिरांमध्ये उत्सव व्यवस्थापित करणाऱ्या समितीच्या सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे.