मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलनं आणि उपोषणं केली आहेत. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव आणला. २०१४च्या ऐतिहासिक सत्तांतरासाठी त्यांची आंदोलनंही एक कारण असल्याचं मानलं जातं. मात्र, सध्या महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जीवनामरणाच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीत आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.
अण्णा हजारे शांत कसे काय आहेत?
- मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने मतदारांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
- त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे.
- सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही केंद्र सरकारविरोधात काढला नाही.
- त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात ‘अण्णा उठो’ आंदोलन करण्यात येणार आहे.
- घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
- महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
- जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत?
- अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे.
- अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे.
- असे मुद्दे काशिद यांच्यावतीने मांडण्यात येत आहेत.
वयोमानानुसार, प्रकृतीमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नाही!
- केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतो.
- युपीए-२ च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते.
- त्याच्या परिणामी काँग्रेस सरकार विरोधात जनमत तयार झाले, असे म्हटले जाते.
- तर, वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
- पण त्याचवेळी ते राज्यातील सरकारला मात्र इशारे देताना दिसतात, हेही सांगितले जाते.