मुक्तपीठ टीम
प्रख्यात माहितीपट निर्मात्या आणि चित्रपट इतिहासकार विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके आणि चित्रपटांचा मोठा संग्रह आता भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग आहे. त्यांची मुलगी, प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी एनएफएआयला हा मौल्यवान संग्रह दान केला. विजया मुळे भारतातील चित्रपट समाज चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या आणि माहितीपट तसेच शैक्षणिक माहितीसाठी त्या प्रसिद्ध होत्या.
एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, “हा भव्य संग्रह स्वीकारताना आम्हाला आनंद झाला. आम्ही सुहासिनी मुळे यांचे आभारी आहोत. त्यांनी एनएफएआयवर विश्वास दाखवून हे सर्व साहित्य जतन करण्यासाठी दान केले. मला खात्री आहे की हा संग्रह जगभरातील चित्रपट संशोधकांना उपयुक्त ठरेल. आम्ही सर्वाना आवाहन करतो की एनएफएआयकडे आर्काइव्ह फिल्मशी संबंधित साहित्य जमा करा, जेणेकरून ती भावी पिढ्यांसाठी जतन करुन ठेवता येईल आणि चित्रपट संशोधकांना ते सहज उपलब्ध होईल.”
विजया मुळेंच्या संग्रहात मोलाचा ठेवा
- व्हीएचएस मध्ये एक टीव्ही मालिका आहे ‘जई फाईट उन बीओ वॉएज’
- इटालियन चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते रॉबर्टो रोसेलिनी यांचा तीन भागांचा कार्यक्रम आहे, ज्याचे नाव ‘हेरेक्स क्यूइ कोम रोजेली’ आहे, जो 11 जानेवारी ते 6 ऑगस्ट 1959 दरम्यान प्रसारित केला गेला.
- सुहासिनी मुळे, तपन बोस आणि सलीम शेख दिग्दर्शित ‘भोपाळ: बियॉंड जेनोसाईड ’ (1986)’ हा माहितीपट आहे. भोपाळमधील कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात 3 डिसेंबर 1984 च्या रात्री विषारी वायू गळतीनंतर झालेल्या दुखद घटनेचे वेदनादायक चित्रण हा माहितीपट उलगडतो.