मुक्तपीठ टीम
कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची शाळेतच गोळी घालून हत्या केली. काश्मिरात टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे. या घटनेवर संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “गरज पडल्यास इथल्या महिलांना दहशतवाद्यांशी सामना करायला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
- नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काश्मिरात मुलींना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणाऱ्या शिक्षकांना लक्ष्य केलं जात आहे.
- त्यांना महिलांना पुन्हा आपल्या घरांमध्ये बंदिस्त करुन ठेवायचं आहे.
- काश्मिरमधील शिक्षकांच्या सुरक्षेची हमी केंद्रानं द्यावी, हे अत्यंत महत्वाचं आहे.
- तसेच गरज पडल्यास त्यांना शस्त्र बाळगण्यालाही परवानगी द्यावी.
नेमकं प्रकरण काय?
- ३६ वर्षीय रजनी बाला यांची मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
- त्या सांबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या.
- काश्मिरी पंडित रजनी बाला कुलगाममधील एका शाळेत शिक्षिका होत्या, त्यांना पंतप्रधान विशेष पॅकेज अंतर्गत पुन्हा काश्मीरला बोलावून नोकरी देण्यात आली होती.
- दरम्यान दहशतवादी शाळेमध्ये शिरले आणि त्यांनी रजनी बाला यांच्यावर गोळीबार सुरु केला.
- गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या रजनी यांना रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाला.
बाला यांच्या हत्येनंतर तीव्र निदर्शने सुरु!!
- काश्मिरी पंडित संघटनेसह डोगरा मोर्चानेही या हत्येचा निषेध करत शहरात रॅली काढली.
- बजरंग दलाच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही बाला यांच्या हत्येचा निषेध केला.
- शिवसेना कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली.
काश्मिरी पंडितांनी व्यक्त केली स्थलांतराची भीती!
- काश्मिरी पंडित नेते विनोद टिक्कू यांनी या हत्येबाबत सांगितले की, दहशतवाद्यांनी खोऱ्यात २२ हिंदूंची हत्या केली असून १४ जणांना जखमी केले आहे.
- चार मंदिरांवरही हल्ले झाले आहेत.
- काश्मीरमधील अल्पसंख्याकांवर हा अघोषित हल्ला असून परिस्थिती सामान्य असल्याचे सरकार सांगत आहे.
- रजनी बाला यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या एका काश्मिरी पंडिताने सांगितले की, आम्ही ठरवले आहे की जर सरकारने २४ तासांच्या आत आमच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल.
- काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे दाद मागून समाज कंटाळला आहे.
- आम्हाला स्थलांतरित केले पाहिजे जेणेकरून आम्हाला वाचवता येईल.