मुक्तपीठ टीम
भारत जोडो यात्रेत लहान मुलांच्या उपस्थितीमुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने नुकतीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लहान मुलांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला आहे असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. अशाच प्रकारे आरे जंगलातील मेट्रो कारशेडला विरोध करण्यासाठी जंगलातील निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवरही आरोप झाला होता.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी
- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू करण्याची विनंतीही निवडणूक आयोगाला केली आहे.
- राहुल गांधी आणि जवाहर बाल मंच “राजकीय हेतूने मुलांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांना राजकीय कार्यात गुंतवत आहेत” असा आरोप करणारी तक्रार प्राप्त झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सांगितले की, असे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये लहान मुलांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते.
- भारत जोडो अभियानांतर्गत मुलांना लक्ष्य केले जात आहे.
- मुलांच्या संस्थेने म्हटले आहे की हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे ज्यामध्ये केवळ प्रौढ व्यक्ती राजकीय पक्षाचा भाग असू शकतात.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “लहान मुलांच्या हक्कांचे हे उल्लंघन आहे. राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी मुलांचा वापर करणे म्हणजे बाल शोषण आहे ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात आणि भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ च्या विरोधात आहे. आयोगाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.”