मुक्तपीठ टीम
नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी यांच्यावरी तडीपारीची कारवाई केली आहे. एम. के. मढवी यांनी काही दिवसांपू्र्वीच शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी यांना नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपारीची अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणातही उल्लेख
- शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दबाव टाकला जात आहे, असा आरोप मढवी यांनी केला होता.
- दसरा मेळाव्यात, सत्तेचा गैरवापर करुन शिवसैनिकांना कसा त्रास दिला जातो असा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.
- दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी मढवी यांचा उल्लेख केला होता.
शिंदे गट आणि पोलिसांवर गंभीर आरोप
- मढवी यांना मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
- काही दिवसांपूर्वीच एम के मढवी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. मढवी यांच्या आरोपांनुसार, “पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला. तसे न केल्यास नवी मुंबईतून तडीपार करू, एन्काऊंटर करू, अशा धमक्या दिल्या. माझ्याकडे १० लाखांची मागणीही केली.”
- या आरोपांवर, निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून मढवी यांनी खोटे आरोप केल्याचा दावा पानसरे यांनी केला.
एम के मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले गंभीर आरोप
- एम के मढवी यांनी काही दिवकांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते की, गेल्या दोन महिन्यापासून शिंदे गटात सामील होण्यासाठी शिंदे गटाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे.
- तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे आलात तर तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं आणि कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या, असं मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
- नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही मला शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी दिली.
- त्यांनी माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपारीची कारवाई करण्याची नोटीसही दिल्याचा गंभीर आरोपही माजी नगरसेवक एम. के मढवी यांनी केला होता.