मुक्तपीठ टीम
सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोची सुरक्षाविषयक चाचणी १७ आणि १८ जानेवारी २०२२ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून घेण्यात येणार आहे. या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांच्याकडून देण्यात येणारे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
“सीएमआरएस यांच्याकडून प्राप्त करण्यात येणारे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर लवकरच मार्ग क्र. १ वर (पेंधर ते सेंट्रल पार्क) प्रवासी वाहतुकीस प्रारंभ होऊन नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.”
सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर हा एकूण ११ कि.मी. लांबीचा, ११ स्थानकांसह तळोजा येथे आगार (डेपो) असणारा मार्ग आहे.
मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मार्गाच्या अंमलबजावणीचे काम सिडकोककडून महा मेट्रोला सोपविण्यात आले होते. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या आतापर्यंत ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, इमर्जन्सी ब्रेक इ. महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडून त्या संदर्भातील प्रमाणपत्रही आरडीएसओकडून प्राप्त झाले आहे.
सीएमआरएस यांच्याकडून घेण्यात येणारी सुरक्षाविषयक चाचणी व त्यानंतर प्रदान करण्यात येणारे प्रमाणपत्र हे मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सीएमआरएस यांच्या पथकाकडून १७ आणि १८ जानेवारी रोजी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकारी तसेच महा मेट्रोचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मार्ग क्र. वर आणि तळोजा आगार येथे मेट्रोची सुरक्षाविषयक चाचणी घेण्यात येणार आहे.
या अंतर्गत रिकाम्या गाडीची तसेच एडब्लू3 मानकांनुसार (कमाल प्रवासी क्षमता) भारासह धावणाऱ्या गाडीची चाचणी, आगार व डीसीसी निरीक्षण, अंडरगिअर परीक्षण, अग्नी/धूर विषयक चाचणी, प्रवासी निर्वासन चाचणी, ध्वनी चाचणी इ. महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, सीएमआरएस आणि रेल्वे मंडळ यांच्याकडून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.