मुक्तपीठ टीम
उल्हासनगरमधील राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य नागरिक मिळून सुमारे दीडशे लोक उपस्थित होते.

हे विद्यालय गरीब, वंचित विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शिक्षण देण्याची सोय करते. मंडळाचे अध्यक्ष मा. महादेव सोनावणे या कामात व्यक्तीगत लक्ष घालतात. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ते तळमळीने काम करीत असतात. या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम करावा म्हणून त्यांनी महा. अंनिस कल्याण शाखेस कळवले. कल्याण शाखेचे कार्यकर्ते आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी प्रबोधन कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून झाली. नंतर विज्ञान दिन का साजरा केला जातो, विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाचे फायदे, वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा या विषयांवर माहिती देतांनाच मधून मधून भोंदू बाबा करतात तसल्या ‘चमत्कारां’चे प्रयोग उत्तम जोगदंड यांनी करून दाखविले. यात, हवेतून सोनसाखळी काढणे, प्रश्नचिन्हावर बेल्ट अडकवून गुरुत्वामध्य संकल्पना समजावून सांगणे, नारळातली करणी, लिंबात लाल धागा काळा करणारे भूत, कलशामध्ये ठराविक अंतराने येणारे पाणी हे प्रयोग करून दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी या चमत्कारांमगील विज्ञान किंवा हातचलाखी सांगून त्याची रहस्ये सांगितल्यावर विद्यार्थी खूप चकित झाले. सर्वांना महा अंनिसच्या कामाची माहिती करून देण्यात आली. कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे समाधान करून दिल्यावर त्यांना खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले आणि पुन्हा असा कार्यक्रम शाळेत घ्यावा म्हणून आग्रह धरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव सोनावणे, मीनाक्षी सोनावणे मॅडम, जी टी पवार सर यांनी मेहनत घेतली.