मुक्तपीठ टीम
कोरोनात मृत्यू झालेल्या वडिलांचे वर्ष श्राद्ध करताना केवळ धार्मिक विधी न करता ज्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वडील कोरोनात मृत्यू झाले आहेत, अशा मुलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील शिक्षणाला मदत करून होशिंग कुटुंबाने वेगळाच आदर्श निर्माण केला.
सोनई(ता.नेवासा)येथील अनिल होशिंग यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होताना अमेरिकेत राहणारा त्यांचा मुलगा अभिजित होशिंग यांनी वडीलांची स्मृती जपण्यासाठी कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्याचे ठरवले. त्याचे मामा हेरंब कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून रोख रक्कम देण्यापेक्षा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर पुढील उच्च शिक्षणाला उपयोग होऊ शकतो असे ठरवले.
याप्रमाणे कोरोना पुनर्वसन समितीचे नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड व अमित होशिंग यांनी या कुटुंबांशी संपर्क करून सोनई,नेवासा, बीड परिसरातील पाच गरजु विद्यार्थी निवडले,पोस्टात कागदपत्रे पूर्ण केली व प्रत्येकी १०हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आज वर्षश्राद्धाच्या दिवशी सकाळी घरगुती कार्यक्रमात अनिता होशिंग यांच्या हस्ते त्या पाच महिला व मुलांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी अमेरिकेतून अभिजित होशिंग यांनी सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व वडील गमावण्याचे आमचे व या मुलांचे दुःख एकच असल्यामुळे त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी व अमित या मुलांच्या शिक्षणासाठी सतत पाठीशी उभे राहू असे सांगितले. या प्रसंगी कारभारी गरड यांनी प्रास्ताविक केले व कोरोनात विधवा महिलांची विदारक स्थिती सांगितली. नगर जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांनी व राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढूस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व याचे अनुकरण गावोगावी वर्ष श्राद्धात व्हायला हवे अशी भावना व्यक्त केली. भारत आरगडे यांनी या प्रसंगी या मुलांना अभिजित,अमितने लिहिलेल्या भावनिक पत्राचे वाचन केले तर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात अशी २५००० मुले अनाथ झाली आहेत.
परदेशातील भारतीयांनी व महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींनी अभिजीत होशिंग यांच्या प्रमाणे मुलांना दत्तक घेऊन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर या मुलांच्या शिक्षणाची भावी काळात सोय होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली.