मुक्तपीठ टीम
मोदी सरकारमधील सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना सत्ता मिळताच वाट्टेल तसं बोलणं भोवलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतानाच अशा प्रकारच्या प्रकरणात अटक झालेले नारायण राणे पहिले मराठी नेते ठरले आहेत. त्यांची जन आशीर्वाद यात्रा प्रत्येक टप्प्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडत होती. महाडमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली चढवली असती, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिकमधील अशाच एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्याचे आदेश निघाले. त्यामुळे राणेंसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्रीपदावर असताना अशा गुन्ह्यासाठी अटक होऊन पोलीस कोठडीत जाणारे नारायण राणे हे पहिलेच मराठी नेते असावेत.
अद्याप त्यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली ते स्पष्ट झालेले नसले तरी रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना संगमेश्वरच्या स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रांसफर वॉरंटसह नाशिकला पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
राणेंना नेमकं काय भोवलं?
- केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा नको ते बोलून गेले.
- नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत.
- त्याच वेळेस महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणेंचा तोल गेला.
- त्यांनी स्वत:चं पद आणि उद्धव ठाकरेंचं पद विसरत वाट्टेल ते बोलले.
राणे काय बोललेत?
- त्यांचे अॅडव्हाईजर कोण, त्यांनाच काही कळत नाही.
- ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार?
- ते काय डॉक्टर आहेत का?
- तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना?
- आणि ती पण लहान मुलांना?
- अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव.
- त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का?
- बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं.
- त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय?
- मी असतो तर कानाखालीच चढवली असती.
- हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?
- सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही.
- राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे
राणेंविरोधात गुन्हे दाखल
- शिवसेनेचे नाशिकमधील शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे.
- त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाडमध्येही युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाड शहराचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि करोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.