मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी शेतकरी हत्यांकांड प्रकरणाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राजभवनासमोर काळी फित बांधत मौनव्रत आंदोलनही करत आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात केली जात आहे.
नाना पटोले यांनी सांगितले की, लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे न्यायालयात ट्रायल सुरु आहेत, नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, किडण्याप करण्यात आलं आणि कुठल्याही न्यायालयासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, ज्याप्रकारे एका महिलेला भाजपाने त्रास दिला तेही देशाच्या लोकांनी पाहिलं
आशिष मिश्राला अटक केली पण, त्याला कुठलाही पिसीआर न घेता न्यायालयीन कोठडीत टाकणे म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यावर ३०२ अंतर्गत तातडीने कारवाई व्हावी, तसेच, अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी आज काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात केली जात आहे.