मुक्तपीठ टीम
नागपुरातील २०० वर्ष जुनी वेश्या व्यवसाय चालत असणारी वस्ती बंद करण्यात आली आहे. नागपुरातील पोलिसांनी या वस्तीतील काही परिसर सील केला आहे. मात्र प्रशासनाच्या निर्णयामुळे वस्तीतील महिला आक्रमक झाल्या असून त्याविरोधात त्यानी आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोलिसांनी कलम १४४ सीआरपीसी अतंर्गत लावलेल्या या परिसरातील बॅरिकेट्स काढून टाकल्या आहेत.
तक्रारींमुळे बॅरिकेटिंगचा पोलिसांचा दावा
- शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गंगा जमुना परिसर बुधवारी संध्याकाळी सील करण्यात आला.
- येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात, अशी तक्रार सांगितली गेली.
- कोरोना काळात या परिसरात नियमांचे पालन केले जात नाही, अशाही तक्रारी आल्याचा दावा पोलिसांनी केला.
- त्यामुळे या वस्तीची नाकेबंदी करण्यासाठी कलम १४४ सीआरपीसी अतंर्गत बॅरिकेटिंग करण्याची कारवाई करण्यात आली.
बॅरिकेटिंगमागे बिल्डरांचा हात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक वेश्यांना घोषणा दिल्या.
- काही महिलांनी या भागात प्रवेश रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेट्स काढले.
- ज्वाला धोटे यांनी आरोप केला की, पोलीस या भागात बॅरिकेट्स लावून जमीन हडप करण्यात बिल्डरला मदत करत आहेत.
गंगा जमुना परिसरात सुमारे ५०० ते ७०० वेश्या राहतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात असलेल्या बहुतेक वेश्या या बाहेरच्या आहेत. परिसरात अनधिकृत बांधकामं झाली आहेत, ज्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. बहुधा या कारवाईच्या माहितीमुळेच पोलिसांवर बिल्डरांच्या फायद्यासाठी वेश्यावस्तीच्या नाकेबंदीचा आरोप होत असावा. स्थानिक समाजसेवकांना विश्वासात घेऊन वेश्यांशी संवाद साधत पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलण्याची गरज होती, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.