मुक्तपीठ टीम
कृष्णा कुमार गौडा या श्रवण दोष असलेल्या युवा क्रिकेटपटूने त्याच्या नेत्रदीपक क्रीडा क्षमतेच्या जोरावर अनेक सन्मान प्राप्त करून त्याच्यासाठी उत्तुंग आकाश हीच सीमा असल्याचे दाखवून दिले आहे. क्रिकेटबद्दलची त्याची ओढ जाणून त्याच्या पालकांनी त्याला या खेळात अधिक रस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याला त्याच्या शाळेतर्फे खेळण्याची संधी मिळाली. त्याने राज्य तसेच राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर त्याच्या शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ साली झालेल्या कर्णबधीर मुलांसाठीच्या महाराष्ट्र टी-२० स्पर्धेत त्याचा संघ विजेता ठरला होता. गेल्या १५ वर्षांपासून तो क्रिकेट खेळत असून या खेळात त्याने अनेक पुरस्कार, पदके आणि प्रमाणपत्रे मिळविली आहेत.
मुंबईत १४ सप्टेंबर १९९७ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात कृष्णाचा जन्म झाला. त्याचे पालक खासगी क्षेत्रात कार्यरत असून त्याला एक धाकटा भाऊ आहे. कृष्णा जन्मापासूनच श्रवणदृष्ट्या दिव्यांग आहे.
पहिल्या इयत्तेपर्यंत तो मुंबईतील मुकबधीर शाळेत शिकला. नंतर त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याला सामान्य मुलांच्या शाळेत दाखल करण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. त्यामुळे सांताक्रूझच्या पोदार शाळेत प्रवेश घेऊन कृष्णाने ११ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांग संस्थेतील डीटीपी अभ्यासक्रमाचा तो माजी विद्यार्थी आहे.
क्रिकेट खेळणे हेच कृष्णाचे मुख्य ध्येय आणि स्वप्न आहे. क्रिकेट खेळाप्रती त्याची समर्पित वृत्ती त्याला अधिक यशस्वी होण्यास मदत करते. सर्व अडथळे पार करून कर्णबधीर मुलांसाठीच्या प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी त्याची निवड झाली. या लीगमध्ये 2022 मध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. क्रिकेटमधील अधिक उत्तम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे या हेतूने त्याने एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रवेश घेतला आहे.
क्रिकेट खेळण्यासोबतच अॅमेझॉन मध्ये १० हजार रुपयांच्या मासिक पगाराची नोकरी मिळवून तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला आहे. नोकरीच्या ठिकाणीदेखील तो त्याचे कौशल्य दाखवीत असतो. कामाप्रती असलेली त्याची समर्पित वृत्ती त्याला व्यावसायिक वर्तुळात देखील अधिक वरच्या पातळीवर घेऊन जाईल.
हा तरुण मुलगा इतरांसाठी एक आदर्श निर्माण करू शकतो. “होय, एक दिव्यांग व्यक्तीदेखील हे करू शकते” हे त्याने श्रवणदोष असलेल्या समुदायाला दाखवून दिले आहे. येत्या काळात, हा मुलगा नक्कीच देशाचे प्रतिनिधित्व करेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल. एक दिवस हा मुलगा देशाची मान जगात अभिमानाने उंच करेल.