मुक्तपीठ टीम
मुंबईच्या चौकाचौकात किंवा सिग्नलवर भिक्षा मागत फिरणारे भिकारी आता दिसणार नाहीत. कारण मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. भिक्षा मागणाऱ्याना पकडून चेंबूरमधील भिक्षेकरी केंद्रात पुनर्वसन करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेसाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून रस्त्यावर फिरणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाची बाब अशी की पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार मुंबईतील भिकाऱ्यांना पकडण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून १४ भिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात त्यांची सोय केली जाणार आहे. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम पूर्ण फेब्रुवारी महिना चालणार आहे.
पोलिसांच्या कारवाईचे मुख्य कारण?
- मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो.
- लहान मुलांचा वापर करुन सहानभुती मिळवून पैसे कमावणाच्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत विकसीत झाल्याचं समोर आलं आहे.
- अनेक लहान मुलांचे अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात.
- काहींनी तर मुंबईच्या चौकाचौकात भिक्षेला व्यवसाय बनवला आहे.
- त्यामुळे याविरोधात आता धडक मोहीम मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.