टाकावू काळे तेल आणि ज्वालाग्राही पदार्थाची अनधिकृतपणे साठवणूक करुन पर्यावरणाला हानी पोचविणार्या तसेच प्रक्रिया केलेल्या काळ्या तेलाची विक्री करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या सर्वांना पुढील कारवाईसाठी मानखुर्द पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मोहम्मद खलील इद्रीसी, मोहम्मद अफजल मोहम्मद अली खान, इरफान मोहम्मद सईद मंसुरी आणि स्वामीनारायण फुरसत डोसाड अशी या चौघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांन पावणेदहा लाख रुपयांचा काळे तेलाचा साठा आणि १९५ ड्रम जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.
मानखुर्द येथील मंडाळा, कुर्ला स्क्रप खाडीलगत एक मोकळी जागा असून या ठिकाणी काही इसम तेल आणि तत्सम ज्वाहाग्राही पदार्थाचा साठा करुन त्यावर प्रक्रिया करुन उर्वरित ज्वालाग्राही पदार्थ खाडीमध्ये सोडून पर्यावरणास नुकसान आणि हानी पोहचवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निनाद सावंत, संजय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद माळवे, राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद कांबळे, कृष्णा नार्वेकर, प्रकाश यदव, पोलीस हवालदार सदानंद परब, चंद्रकांत राऊत, सुनिल साळोखे, सूर्यकांत आंब्रे, पोलीस नाईक संदीप कांबळे, संदीप तळेकर, अजय बल्लाळ, ज्ञानेश्वर मिंडे, पोलीस शिपाई राजाराम पाटील, अनुपम जगताप यांनी तिथे अचानक छापा टाकला होता. यावेळी तिथे काळ्या तेलाने भरलेले १९५ ड्रम आणि १०० रिकामे ड्रम तसेच काही ड्रममधील पदार्थ खाडीत टाकलेले दिसून आले होते, या तेलामुळे तिथे प्रचंड उग्र वास येऊन डोळ्यांना त्रास तसेच पर्यावरणाला हानी पोहचत होते. त्यामुळे तिथे असलेल्या मोहम्मद खलील, मोहम्मद अफजल, इरफान मंसुरी आणि स्वामीनारायण या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत ते चौघेही तिथे काळ्या तेलावर प्रक्रिया करुन त्या तेलाची बाजारात विक्री करीत होते. उर्वरित तेल ते चौघेही खाडीत फेंकून देत होते.
या गुन्ह्यांत या चौघांचा सहभाग उघड होताच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध २७७, २७८, ३३६, २८५, ३४ भादवी सहकलम १५ (१) पर्यावरण संरक्षण कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या चौघांना नंतर मानखुर्द पोलिसांकडे सोपविण्यात आला असून त्यांची संबंधित पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.