मुक्तपीठ टीम
१५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पीडित अल्पवयीन असूनही तरुणीला या संबंधाच्या परिणामाची कल्पना होती. तसेच तरुण २२ वर्षाचा असून त्यालाही मोह आवरला नसल्याची बाब नाकारता येत नाही, असे न्यायालयाने सांगितले. अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून हा तरूण तुरुंगात होता. आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
१५ नोव्हेंबरच्या या आदेशात न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या की, ‘पीडित तरुणी तिच्या मर्जीने तरुणासोबत त्याच्या मावशीच्या घरी गेली होती. या वर्तनाच्या परिणामांची जाणीव तिला होती आणि ती स्वतः हून त्याच्याबरोबर गेली होती. त्यामुळे ती आरोपीच्या प्रेमात होती हे तिने मान्य केले आहे. हे लैंगिक कृत्य तिच्या स्वेच्छेने होते की नाही, हे आता केवळ पुराव्याच्या आधारे ठरवता येईल. खटला सुरू व्हायला अद्याप अवधी आहे. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवू शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच पीडितेशी संपर्क करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
बलात्कार झाल्याचे कधी उघडकीस आले?
- याप्रकरणी २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबई उपनगरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- ६ एप्रिल रोजी हा बलात्कार झाला होता.
- २९ एप्रिल रोजी पीडिता आणि आरोपीचे व्हॉट्स ॲपवरील संभाषण कुटुंबियांनी पाहिल्यानंतर पीडितेनं आरोपीसोबत केलेल्या कृतीची माहिती घरच्यांना दिली.
- त्यानंतर घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.
- आरोपीसोबत व्हॉट्सॲपवरून बोलताना पकडले जाईपर्यंत पीडित मुलीनं घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली नसल्याचं स्पष्ट झालंय.