मुक्तपीठ टीम
मुंबईच्या १६ वर्षीय तरूणीनं अलिबागमधील गावकऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतल्याची ही बातमी सर्वात मोठी चांगली बातमी आहे. मुंबईची ही आपली मुलगी म्हणजे नंदिनी कटारिया. ती राहते चर्चगेटला. ताडदेवच्या हील स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिने पुढाकार घेऊन गावकऱ्यांचं लसीकरण केल्यानं सध्या तिचं चौफेर कौतुक होत आहे.
नंदिनीच्या कुटुंबाचा रायगडच्या अलिबागमधील धोकावडे गावात हॉलिडे होम बंगला आहे. ती तेथे १४ जून गेली तेव्हा त्यांनी बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे स्वखर्चानं लसीकरण केले. तेव्हाच नंदिनींने कर्मचार्यांकडून गावात लसींची कमतरता निर्माण झाल्याची तक्रार ऐकली. तिने घरच्यांशी बोलून योजना आखली. त्या गावातील इतर श्रीमंत बंगला मालकांकडून १२ लाख जमवण्यात आले. त्या पैशातून मुंबईच्या अपोलो रुग्णालयाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी नंदिनीने स्थानिक पंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधला.
अलिबागमध्ये दुसरे घर असलेल्या कटारिया यांनी आपल्या लेकीला प्रोत्साहन दिले. त्यांनी अलिबागमधील समस्या समजून घेण्यासाठी धोकावडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना समजले १८ ते ४४ वयोगटातील क्वचितच कुणाला लस मिळाली आहे. त्यामुळे कटारियांच्या बंगला असलेल् धोकावडे गावातील आणि अन्य गावांमधीलही बंगला मालकांकडून निधी गोळा करून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच अलिबागमधील अपंग व मानसिकदृष्ट्या दिव्यांग रहिवाशांचेही लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे.
मुंबईची ही सोळा वर्षांची मुलगी. पण तिने हाती घेतलेले काम मोठ्यांनाही अभिमान वाटावं असं आहे!
खूप छान कार्य…