मुक्तपीठ टीम
वातावरणातील गारवा आणि पर्यटकांची ओढ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसी पुढे सरसावत आहे. नववर्षानिमित्त पर्यटकांसाठी प्रसन्न संस्मरणीय अनुभव मिळतील असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, आयुर्वेदिक आणि नैसर्गिक अप्रतिम खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे. कोरोनासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यटकांच्या आरोग्याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याने पर्यटकांनी महामंडळाच्या साथीने मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करावा, असे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.
पर्यटनासाठी पूरक वातावरण पाहता पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असून पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचाही महामंडळाचा मानस आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून जवळपास दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचीही माहिती वेबसाईट, फेसबूक आणि व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
पर्यटक निवासांमध्ये निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना अव्याहतपणे सुरू असून निवास, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकोरपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटक प्राधान्य देत असून डिसेंबरमध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 90 टक्के आरक्षण झाले आहे.
पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोविडविषयक भान ठेवून पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.