मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर हिंदुत्वावर सुरु असलेल्या वादावर विचार मांडले. ते म्हणाले की, संघाकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल नाही, हा आरोप निराधार आहे.
हिंदू आणि हिंदुत्वावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “काही शब्द आपल्या आयुष्याला जोडलेले राहतात, ते काढता येत नाहीत. हिंदुत्व हा शब्द संघाला जोडला गेलेला आहे. हिंदुत्व कोणाला जिंकवण्याची चर्चा करत नाही.”
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित माजी सैनिक प्रबोधन कार्यक्रमात ते म्हणाले की, गेली ९६ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच विरोध होता. पण आम्ही समाजसेवा करत राहिलो. स्वयंसेवकांची सत्ता आल्यावर संघाला थोडा दिलासा मिळाला. सर्व अडथळ्यांवर मात करत ९६ वर्षे समाजसेवा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे गेला.
हिंदुत्व संघाशी जोडलेले, सत्तेचा रिमोट संघाकडे नाही!
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वावरही खुलेपणाने भाष्य केले.
- ते म्हणाले की काही शब्द आपल्या आयुष्याला जोडलेले राहतात, ते काढता येत नाहीत.
- हिंदू हा शब्द हिंदुस्थानातून आला आहे.
- हिंदुत्व हा शब्द संघाला जोडला गेलेला आहे.
- हिंदुत्व कोणाला जिंकवण्याची चर्चा करत नाही.
- हिंदुत्व हा शब्द सर्वप्रथम गुरू नानक देवजींनी वापरला.
- हिंदुत्व हे सर्वांना जोडतं. कोणालाही तोडत नाही.
- गेल्या ४० हजार वर्षांपासून सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे.
- धर्म म्हणजे श्रद्धा, जी समाजाला जोडते. याचा अर्थ हिंदू आणि मुस्लिम असा नाही.
- आपल्यात नेहमी फूट पडली म्हणून आपण गुलाम झालो.
चीन – पाकिस्तानवरही भाष्य
चीन आणि पाकिस्तानबद्दल सरसंघचालकांनी थेट नाव घेऊन काही म्हटलेलं नसलं, तरी अप्रत्यक्ष संदेश दिला, ते म्हणाले की, भारताचे कधीही कोणाशीही वैर राहिलेले नाही. पण जगात शत्रू आहेत. जर कोणी शत्रू असेल तर नतमस्तक होऊ नका, तर शत्रूला दाबून पुढे जा. ते म्हणाले की, लष्करी सज्जतेच्या बाबतीत आपल्या सैन्याची अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी तुलना केली जाऊ शकते, परंतु साहस, धैर्य आणि सामर्थ्य या बाबतीत भारतीय सैन्य जगात अव्वल आहे. ही ताकद भारतीय सैनिकांच्या शारीरिक प्रशिक्षणातून येत नाही तर मनातून येते. भारतीय जवान शौर्याने लढतात. ते सीमेवर लढतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माजी सैनिकांची काळजी घेत असतो. संघाची पूर्व सैनिक सेवा परिषद संघटना आहे, जी संघाची विचारधारा लष्करी कुटुंबांपर्यंत पोहचवते. मोहन भागवत यांनी कार्यक्रमात हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमात एक मिनिट मौन पाळण्यात आले. त्यानंतर दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करून मौन पाळण्यात आले.