मुक्तपीठ टीम
वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे बेलापूर न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांचा १५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तर या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असल्याची माहिती न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी दिली आहे.
२६ जानेवारी २०१४ मध्ये वाशीमध्ये राज ठाकरे यांच्यावर भडकवणारे भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहिले होते.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी जोरदार तयारी केली होती. तसेच शहरात बॅनरबाजी करण्यात आली. चार ते पाच हजार कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने बेलापूर न्यायालयाच्या वॉरंडमुळे मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आयती संधी मिळाली.