मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या आनंदाच्या दुधात मिठाचा खडा पडलाय. गुजरात दंगलीचं कारण ठरलेल्या गोध्राच्या नगर परिषदेवर आता एमआयएमने सत्ता स्थापन केली आहे.
गुजरातमध्ये नुकत्याच नगर परिषद निवडणुका पार पडल्या होत्या. भाजपाने बहुतेक नगरपालिकांवर आपला झेंडा फडकावला. पण गोध्रा नगरपालिकेत पक्षाला सत्ता संपादन करता आली नाही. त्यामुळे भाजपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
एमआयएमचा ऐतिहासिक विजय
- गुजरातमध्ये २००२ साली गोध्रा जळीतकांडात करसेवकांचे बळी गेल्यानं गोध्रा शहर चर्चेत आलं होतं.
- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणं हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे.
- एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे.
- ओवेसी यांच्या पक्षाने पालिकेच्या ७ जागांवर विजय मिळविला होता, परंतु १७ अपक्षांनी त्यांना पाठिंबा देऊन नगरपालिकेची सत्ता मिळवून दिली आहे. एमआयएमला मिळालेल्या समर्थनातील १७ अपक्ष सदस्यांपैकी ५ सदस्य हे हिंदू आहेत. तरीही ते ओवेसींसोबत गेले.
प्रथम दिले निवडणुकीत आव्हान
- गुजरातच्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये ओवेसी यांच्या पक्षाने भाजपाला आव्हान दिले होते.
- या निवडणुकांमध्ये प्रथमच उतरल्यानंतरही ओवेसीच्या पक्षाने सर्वांना चकित केले.
- गोध्राव्यतिरिक्त अहमदाबादमध्ये औवेसीच्या पक्षाचे ७ नगरसेवक विजयी झाले आहेत.
- एवढेच नाही तर मोडसा येथे ९ उमेदवार विजयी झाले आहेत.
१८ उमेदवारांच्या विजयानंतरही भाजप विरोधी पक्ष
- गोध्रा नगरपालिकेत एआयएमआयएमने भाजपाचा पराभव केला आहे, त्या पालिकेवर बहुमत सिद्ध करण्यासाठी एकूण २३ नगरसेवकांची आवश्यकता होती.
- १७ अपक्षांच्या पाठिंब्यानंतर एमआयएमला २४ सदस्यांचे बहुमत मिळाले.
- त्यामुळे १८ उमेदवारांच्या विजयानंतरही भाजपा विरोधी बाकांवर दिसणार आहे.