मुक्तपीठ टीम
मुंबईतील आरे जंगलात हजारो झाडांची कत्तल करून उभारलेल्या मेट्रो कारशेडला आघाडी सरकारने रद्द केले होते. राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने ती कारशेड आरेतच बनवण्याचा निर्णय जाहीर केला. तशा निर्णयाचा आदेशही जारी झाला. त्यामुळे पर्यावरणप्रेमी मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत. काहीजणांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आपली बाजू मांडण्यासाठी निवेदन जारी केले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे निवेदन
दिनांक २१ जुलै २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक २९ नोव्हेंबर २०१९चे आदेश रद्दबातल ठरवले आणि आरे येथील मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरू करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशनला आदेशित केले आहे . त्या नुसार डेपोमध्ये प्राथमिक कामे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यतः साफ सफाई आणि जागा समांतरीकरणाचे काम समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे डेपो चे मुख्य काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता करून देण्याचे काम कंत्राटदारांनी सुरू केले आहे. हे सर्व काम मा. सर्वोच्च न्यायालय, मा. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे सर्व आदेश यांचे काटेकोपणे पालन करून करण्यात येत आहे.
डबे उतरवण्यासाठी सारीपुत नगरकडे रॅम्प
तसेच ट्रेनची प्रारंभिक डिझाईन चाचणी करण्याच्या अनुषंगाने आरे डेपो बाहेर सारीपुत नगर येथील रॅम्प नजिक ट्रेनचे डबे उतरवून घेणे, त्यांची जुळवणी करणे यासाठी तात्पुरती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. अशी सुविधा निर्माण करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने यापूर्वीच आदेश दिले होते त्यानुसार ही सुविधा तयार करण्यात आली आहे. पाळण्यात आले आहेत.
ही सुविधा मरोळ मरोशी मार्गाजवळील बोगद्याच्या तोंडाशी आहे. आठ डब्यांची एक ट्रेन आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आली आहे. या ट्रेन चे लवकरच मुंबईत आगमन होत आहे. याच मेट्रो ट्रेनच्या प्रारंभिक डिझाईन चाचण्या आता सुरू होणार आहेत.
कारडेपोचे काम आणि डबे उतरवून घेण्यासाठीची सुविधा ही वेगवेगळी कामे असून एकाच वेळी हाती घेण्यात आलेली आहेत.
मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा
कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. येथे ट्रेनची देखभाल रोज होते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामे येथे हाती घेण्यात येतात. यामुळे सर्व ट्रेन्स सुरळीतपणे धावण्यास मदत होते. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित ठरण्या साठी कार डेपो एक महत्त्वाचा दुवा ठरतो. येथेच ट्रेन्स उभ्या करण्याची सुविधा असते. त्याच प्रमाणे चाकांची काळजी घेणे, ट्रेनची सफर सुरक्षित होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चाचण्या सुविधा उपलब्ध असतात. येथेच संचलन आणि नियंत्रण कक्ष देखील उपलब्ध असतो.
मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्प पासून मरोळ नाका मेट्रो स्थनाकापर्यंतच्या ३ कि.मी. लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. येथेच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सुविधेत ट्रेन पार्क करण्यात येणार आहे.
डेपोचे काम पूर्ण करून सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सुरू करण्याची मुं.मे.रे.कॉ.ची अपेक्षा आहे.