मुक्तपीठ टीम
राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आले असताना गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनास्थिती सुधारत असल्याचे दिसत असल्याने राज्य सरकारकडून निर्धारित वेळेनुसार लोकल सेवा सर्वांसाठी सुरु केली. पण लोकल सेवा सुरु केल्यापासून गर्दी वाढली. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत गेली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संख्येत आणखी वाढ झाली तर कठोर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लॉकडाउनबद्दल मोठे विधान केले आहे.
किशोरी पेडणेकरांचा इशारा
- मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही खूपच चिंतेची बाब आहे.
- मास्क न लावता अनेक लोक लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे.
- हा बेजबाबदारपणा असून आपल्याला खबरदारी बाळगावीच लागेल
- अन्यथा आणखी एका लॉकडाऊनच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल.
- तेव्हा लॉकडाउन पुन्हा हवे आहे की नको हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे.
रुग्णसंख्या वाढण्यास लोकलच कारणीभूत नाही- सुरेश काकाणी
- कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन मुंबई महापालिकेने सावधगिरीचा इशारा देत लोकल सेवा सुरु केली होती.
- लोकलच्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे मानले जात आहे मात्र, आता हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- मोजक्या शहरांतून किंवा मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत्या. पण आता विमान सेवांची संख्यापण वाढली आहे.
- त्यामुळे लोकल रुग्ण संख्या वाढीचे एकमेव कारण म्हटले जाऊ शकत नाही.