मुक्तपीठ टीम
दिल्लीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा एकदा सक्तीचे केले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मुंबईतही १ जुलैनंतर पहिल्यांदाच बुधवारी ८५२ एवढे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात बुधवारी १ हजार ८४७ नवे रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीत किती वाढला कोरोना?
- देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
- दिल्लीत बुधवारी २४ तासांत कोरोनाचे २ हजार १४६ नवीन रुग्ण आढळले.
- दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर १७.८३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
- दिवसभरात कोरोनाने आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क का आवश्यक?
- कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मास्क घालणे हा प्रभावशाली मार्ग ठरु शकतो.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने (सीडीसी) मास्क घालण्याबद्दल काही सूचना कोरोना लाट उसळली असताना जारी केल्या होत्या. त्यांचं पालन केल्यास संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.
त्यातील काही सूचना पुढील प्रमाणे आहेत:
अशा प्रकारे मास्क घालणे गरजेचे
मास्क घालणे अनेकांना आवडत नाही, परंतु प्रत्यक्षात याचा फायदा होतो असे संशोधनातून समोर आले आहे.
योग्य पद्धतीने चांगला मास्क घातल्याने कोरोना व्हायरसविरूद्ध चांगले संरक्षण मिळू शकतो.
त्यातही एक सर्जिकल आणि एक साधा असे दोन मास्क एकत्र लावल्याने विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यास रोखू शकतो.
कानाच्या मागे घट्ट करा मास्क
कानाच्या मागे मास्क घट्ट केलेल्याने आपले तोंड आणि नाक पूर्णपणे संरक्षित होईल.
जर मास्क आपल्या तोंडावर आणि नाकावर फिट असेल तर शरीरात विषाणूचा शिरकाव होत नाही.
मास्क घालताना आणि काढताना या गोष्टी लक्षात घ्या
- मास्क घालण्याच्या अगोदर साबण आणि पाण्याने हात पूर्णपणे धुवा किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करून मास्कला स्पर्श करा.
- मास्क फाटलेला आहे की नाही हे नक्की पाहून घ्या.
- मास्क अशा प्रकारे घाला, जेणे करून चेहरा, तोंड, नाक आणि हनुवटी योग्य प्रकारे झाकले जाईल.
- तसेच मास्क काढताना साबण-पाणी किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या.
- जर मास्क काही वेळेसाठी घातला असेल तर तो प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये ठेवा किंवा गरम पाण्याने धुवून काढा.