मुक्तपीठ टीम
यावेळी महाराष्ट्रावर पावसाने चांगलीच कृपा केली. त्यामुळे काही ठिकाणी पुराचा त्रास झाला असला तरी पाण्याची टंचाई जाणवायचा धोका मात्र टळलाय. मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच दुष्काळग्रस्त लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
पाऊस भरपूर, पाणी पुरेपूर!
- गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ म्हणजेच जीएमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रातील विविध जलाशयांनी साठवण कमाल पातळी गाठली आहे.
- जीएमआयडीसीचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी म्हणाले की, मराठवाड्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा आहे जो पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागवू शकतो.
- जायकवाडी प्रमुख सिंचन प्रकल्पातही भरपूर पाणी साठलंय.
- चांगल्या पावसामुळे या भागातील इतर मुख्य पाणी प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत.
- पैठण येथे औरंगाबादपासून सुमारे ५५ किमी अंतरावरील जायकवाडी धरण शेजारच्या जालना आणि इतर काही भागांना पाणी पुरवठा करते.
- लातूरला त्याच्या पाण्याच्या गरजांसाठी बीड जिल्हातील मांजरा धरणावर अवलंबून रहावे लागायचे. आता गेल्या वर्षीच्या दुप्पट प्रमाणापेक्षा जास्त पाणी आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या गरजांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त, कृषी क्षेत्र आणि उद्योगांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात फारशी अडचण येणार नाही.