तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
गुरुवारचा दिवस टीव्ही चॅनल्ससाठी निकालाचा दिवस. आज जाहीर झालेल्या नव्या टीव्ही रेटिंगमध्ये पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठीने आपलं मराठीतील न्यूज चॅनल नंबर १चं स्थान कायम राखलं आहे. त्यांना किंचित ०.४चा फरक पडला आहे. तर झी २४ तास दुसऱ्या क्रमांकावर राहतानाच ०.४ ने पुढे गेले आहे. एबीपी माझा न्यूज चॅनल याही गुरुवारी ०.१ वाढीसह तिसऱ्या क्रमांकावरच आहे. चौथ्या क्रमांकावरील साम, पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत आणि सहाव्या क्रमांकावरील लोकशाही किंचित फरकासह आहे तेथेच आहेत. झी २४ या आठवड्यात पुढे सरसावल्याने पहिल्या क्रमांकापासून १.६ ने दूर आहे, मात्र त्याचवेळी त्यांच्या दूरदर्शनच्या फ्रि डिशवरील एकमेव अस्तित्वाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
चार आठवड्यांच्या रेटिंगवर नवं रेटिंग
- सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
- या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
- ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
- याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
- चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
- या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.
कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?
- मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.४ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे. त्यांच्यात ०.४ची घट आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर २६.८% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.४ ची वाढ आहे.
- एबीपी माझा १८.८ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात ०.१ ची वाढ आहे.
- चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही ११.९% मार्केट शेअरसह आहे.त्यांच्यात ०.१ची घट आहे.
- पाचव्या क्रमांकावर ८.६ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.१ची वाढ आहे.
- सहाव्या क्रमांकावर नव्यानं सुरु झालेलं लोकशाही न्यूज चॅनल ५.६ % मार्केट शेअरसह आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.
समजून घ्या कोणाचं कसं?
- पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9च्या रेटिंगमध्ये ०.४ अशी घट होत असताना दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासच्या रेटिंगमध्ये तेवढीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता फरक हा १.६ वर आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी झाल्यास झी २४ तास हा टीव्ही 9च्या पहिल्या स्थानासाठी धोका ठरु शकतो.
- एबीपी माझासाठी पुढे सरसावणं तेवढं सोपं नसणार. त्यांना मोठ्या फरकासह काही आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुन्हा आपले स्थान किंवा किमान नंबर २च्या स्थानावर जाता येईल. अपवाद जर झी २४ तासच्या फ्रि डिशवरील अस्तित्वावर काही हालचाली झाल्या तर मोठा बदल अशक्य नाही.
- साम, न्यूज 18 लोकमत या दोन चॅनलची स्थिती काहीशी जशी आहे तशी आहे.
- लोकशाही या नव्या न्यूज चॅनलचे वितरण चांगले आहे. त्यांना मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणखी चांगले प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यासाठी चांगला टाइम स्पेंट हा दिलासा देणारा प्रोत्साहनात्मक भाग आहे. त्याचा अर्थ त्यांना पाहणारे प्रेक्षक हे त्यांचं चॅनल जास्त वेळ पाहत आहेत. जाहिरातदारांच्या दृष्टीने रेटिंग एवढाच टाइम स्पेंटही महत्वाचा असतो. कमी रिच असणाऱ्या चॅनलच्या बाबतीत हा फायदा आहे.
आता फ्री डिशचा वाद पेटणार?
- झी २४ तासची मुसंडी ही दूरदर्शनच्या फ्री डिशवरील एकमेव मराठी न्यूज चॅनल असल्याने झाली असल्याची कुजबुज मराठी टीव्ही विश्वात सुरु झाली आहे.
- याआधीही उदय निरगुडकर संपादक असताना त्याचाच फायदा झाला होता. त्यानंतर फ्रि डिशवरून दूर केल्यानंतर रेटिंगही घसरले होते.
- आताही काही मराठी चॅनल्स २४तासला फ्रि डिशमुळे फायदा मिळत असल्याचा मुद्दा मांडून विरोध करण्याची शक्यता आहे.
- फ्रि टू एअर नसून पे चॅनल असूनही फ्रि डिशमुळे त्यांना ग्रामीण भागात मोठा फायदा होतो, असा आक्षेप घेतला जात आहे.
- अर्थात असा आक्षेप घेतला जात असला तरी सध्याचे संपादक निलेश खरे येण्याच्याआधीपासूनच झी २४ तास हे चॅनल फ्री डिशवर गेले होते, त्यामुळे तो निव्वळ फ्रि डिशचाच फायदा आहे, असं सांगणं हे काहीसं कंटेट टीमवर अन्यायाचंच ठरेल, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
- एकीकडे फ्री डिशचा फायदा मिळाल्यामुळे झी २४ तास पुढे जात असेल तर त्याचवेळी इतर मराठी न्यूज चॅनल्ससारखं फ्री टू एअर नसून पे चॅनल असल्याचाही फटका नजरेआड करू नका, असेही सांगितले जाते.
- जर इतर चॅनल्सना फ्रिश डिशबद्दल बार्ककडून आधीप्रमाणे काही निर्णय मिळवता आला तर त्याचा मोठा फटका २४ तासला आणि मोठा फायदा एबीपी माझाला होईल. ते किमान २ऱ्या क्रमांकावर सरकू शकतील. टीव्ही 9 लाही त्याचा फायदा होईल. त्यातही त्यांचे स्थान अधिकच पक्कं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)
खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:
गेल्या आठवड्यात किती होतं कुणाचं रेटिंग?
टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा: