मुक्तपीठ टीम
संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून सोबत काम करूया, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क आणि स्त्री आधार केंद्रामार्फत आयोजित हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत जागृती निर्माण करणाऱ्या ‘मंथन’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, संपर्क आणि स्त्री आधार केंद्राचे विश्वत आणि सदस्य, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विधीमंडळ सभागृहातील चर्चेपासून गावपातळीपर्यंत वातावरणीय बदलाबाबत मंथन होऊ लागले आहे, ही अत्यावश्यक आणि सकारात्मक बाब आहे. वातावरणीय बदल स्वीकारून ते रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे. माझी वसुंधरा अभियान राबविताना याचा अनुभव येत असून गावपातळीपर्यंत प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने युनिसेफसोबत शालेय अभ्यासक्रमासाठी तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत वातावरणीय बदलाबाबत काम करण्यासाठी करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन लहान लहान पर्यावरणपूरक सवयींचा अंगिकार केल्यास हे बदल रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रात देशात आघाडीवरचे राज्य आहे. तथापि ज्या क्षेत्रात अजूनही आपल्याला चांगले काम करायचे आहे त्याबाबत राज्याने निती आयोगासारख्या केंद्रीय संस्थांसमोर आपले काम दाखवून देण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेले काम कौतुकास्पद आहे. यात सखोल काम होण्याच्या दृष्टीने पाणी, हवा, शेती, घनकचरा अशा विविध क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी आयोजित ‘मंथन’ परिषदेत तज्ज्ञांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वातावरणीय बदलांबाबत विधीमंडळ सभागृहाबरोबरच गावपातळीवरही मंथन होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
ही परिषद दोन दिवस चालणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने मंथन करणार आहेत.
यानंतर दुसऱ्या सत्रात दिल्ली येथील परवी संस्थेचे अजय झा यांनी जग, भारत आणि महाराष्ट्र : हवामान बदल आणि शाश्वस्त विकास उद्दिष्टे यांची सांगड याबाबत मांडणी केली. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात हवामान बदल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यावरील कामाची गरज याबाबत अमिताव मलिक, प्रशांत गिरबाने यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर शाश्वस्त विकासाची उद्दिष्टे ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता यावर प्रियदर्शिनी कर्वे, शिरीष फडतरे तर जमीन, पोषण आणि शेती – दिलीप गोडे, रमेश भिसे त्याचबरोबर पाणी याविषयावर अभिजीत घोरपडे, आरोग्यवर डॉ.संदीप साळवी, शिक्षण संदर्भात संस्कृती मेनन, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती या विषयावर अरुण शिवकर तर महिला आणि हवामानबदल यासंदर्भात स्त्री आधार संस्थेच्या अपर्णा पाठक आणि विभावारी कांबळे यांनी मांडणी केली. परिषदेत वक्त्यांचे स्वागत सचिव रवींद्र खेबुडकर तर पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन ‘संपर्क’च्या मेधा कुळकर्णी यांनी केले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन मृणालिनी जोग यांनी केले.
या परिषदेच्या ०९ फेब्रुवारी रोजीच्या सत्रात नागरिकांचा कृती कार्यक्रम या अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कृषी सचिव एकनाथ डवले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे हवामानबदल आणि विकासाची शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी केलेले प्रयत्न विविध शासकीय विभागांची मांडणी याबाबत विचार मांडणार आहेत.